Swargvibha
Dr. Srimati Tara Singh
Administrator

कावळा

 

लेखक :- विश्वनाथ शिरढोणकर
-------------
-मोंटूचा १८ वा ' बर्थडे ' होता . कालच त्याच्या ' डेड ' नी त्याच्या साठी पाचहजार रुपयांची ' ब्रांडेड ' ' जीन्स ' ' बर्थडे ' साठी आणून दिली होती . ती ' जीन्स ' घालून त्यानं वर अर्ध्याबाह्यांचा ' शार्ट ' चढविला व तो कालेज मध्ये जाण्यासाठी तयार झाला . नवे मोजे नवे महागडे ' रिबॉक ' चे जोडे घालून त्याने ' सोनी इरक्सन ' मोबाइल ' खिशात ठेवला . नंतर त्याने ' कॉलेज 'साठी लागणारी ' बेग 'पाठीवर लटकावली . ' रेबोन्स ' चे 'गॉगल्स ' कपाळावर चढवून , नुकतीच विकत घेतलेली एक लाख रुपयांची चटक लालरंगाची त्याच्या आवडत्या ' बाईक ' जवळ तो ' कीरिंग ' बोटांवर गोल गोल फिरवीत बाहेर आला . सकाळचे सात वाजत होते , आणि मोंटू नावाचा हा तरुण ' हिरो ' क्षिक्षणाच्या युध्दभूमीवर जाण्यासाठी ' हेल्मेट ' घालून सज्ज झाला होता .
-आजच्या वाढदिवसाच्या दिवसभराच्या कार्यक्रमाच्या कल्पनेत तो रमला होता . सकाळी दहा वाजून दहा मिनिटात ' कॉलेज ' मध्ये पोहचल्यावर पहिल्या तीन पिरीयडसनंतर मोंटू आणि त्याची मित्रमंडळी इतर पिरीयडसला दांडी मारणार होती . नंतर छानशा हॉटेलमध्ये मोंटूच्या ' फ्रेंड्स 'कडून अकराच्या सुमारास एक ' लंच ' वाढदिवसा निमित्त आयोजित करण्यात आलं होतं . तिथून ही सगळी , ' बाईकर्स फौज ' दुपारचा सलमानखानचा
' दबंग ' बघायला मल्टीफ़्लेक्समध्ये जाणार होती . सर्वाना ' मुन्नी बदनाम हुई ' हे गाणं पाहण्याबरोबरच ' डॉल्बीसाउंड ' ऐकण्याचाही आनंद लुटायचा होता . ' दबंग ' मोंटू कडून
' बर्थडे ' निमित्त सर्वांना ' ट्रीट ' होती . त्यासाठी ' मॉम ' ने त्याला ' पाकेटमनी ' च्या व्यतिरिक्त पाच हजार रुपये मौजमज्जा करण्यासाठीच दिले होते . सिनेमा संपल्यावर मोंटू फक्त आपल्या ' गर्लफ्रेंड ' मोनिका बरोबर तिच्या घरी जाणार होता . तिच्या कडे मोनिकाच्या ' मॉम ' ने त्याला त्याच्या ' बर्थडे ' निमित्त दुपारच्या ' स्नेक्स ' साठी आमंत्रित केले होते . मोनिका कडे ' टी ' घेतल्यावर संध्याकाळी पाच वाजेपावेतो मोंटू घरी परतणार होता .
- मोंटूच्या ' बर्थडे ' चे ' ग्रांड सेलिब्रेशन ' संध्याकाळी एका ' फाईवस्टार ' हॉटेलच्या मखमली ' लॉन ' मध्ये ठेवण्यात आले होते . डेकोरेशन , साउंड सिस्टम , डीजे , विडियो ग्राफी , या सर्वांची व्यवस्था आपल्या लाडक्यासाठी मोंटूच्या 'डेड ' ने केली होती बऱ्याच 'हाईप्रोफाईल ' लोकांना लाडक्या मोंटूच्या ' बर्थडे ' साठी 'इन्व्हिटेशन ' होतं . 'डेड ' च्या अफिसातल्या , आणि इतर बड्यामंडळींसकट ' मॉम ' च्या ' किटी पार्टीतल्या ' व इतर काही मोठ्या ' क्लब ' च्या ' फ्रेंड्स ' नाही ' इन्व्हिटेशन ' होतं . मोंटूची बहिण बॉबीचे ही 'फ्रेंड्स ' पण हा ' बिगइवेन्ट ' ' इंजाय ' करण्यासाठी ' इंव्हायटेड ' होते . मोनिका सकट मोंटूचे काही ' फ्रेंड्स ' पण येणार होतेच .
- ' डिनर ' व पार्टीच्या इतर सोयी होत्याच . महागडा ' डेकोरेटेड बर्थडे केक ' कापला जाणार होता . सर्व व्यवस्था हॉटेलची असल्यामुळे मोंटूचे ' डेड ' निश्चिंत होते , तर मोंटू ची ' मॉम ' ही फार खुश होती . खरं तर मोंटूच्या डेडचे सर्व मित्र आपापल्या बायकांसकट येणार होते आणि पिण्याची व्यवस्था ही चांगल्या पैकी होती . म्हणजे हॉटेलची सर्व व्यवस्था असल्याने मोंटूची मॉम सर्व बायकांना ' अटेंड ' करण्यासाठी मोकळी राहणार होती . नाही म्हटलं तरी मोंटूच्या डेडचे ' प्रमोशन ' सकट इतर बरीच कामं व्हायची होती . म्हणून बड्या लोचा महिना कांच्या बायकांनाही " अटेंड " करणं गरजेच होतंच . आणखीन एक महत्वाच म्हणजे , मोंटूच्या मॉमला शेजारच्या बंगल्यात राहणाऱ्या मिसेस साहनींनी काही दिवसा पूर्वी , त्यांच्या आठ वर्षाच्या ' डम्पी ' नावाच्या मुलाचा थाटात साजरा केलेल्या ' बर्थडे ' पेक्षाही जास्त थाटात आपल्या मोंटू चा बर्थ डे साजरा करून मिसेस
साहनींना सर्व मैत्रिणीसमोर खाली पाडायचं होतं . मॉम ला येणाऱ्या दिवसात ' किटी पार्टी ' त मिसेस साहनींनी त्यांच्या लाडक्या 'डम्पी ' च्या ' बर्थडे ' पार्टीत केलेल्या खर्चा पेक्षा मोंटूच्या बर्थडे पार्टीत किती तरी जास्त पटीने खर्च केलेला आहे हे ही सांगत राहायचं होतं आणि मिरवायचंही होतं . म्हणून खर्चाचीही पर्वा नव्हती .
- तर असा हा' बर्थडे बॉय ' मोंटू बाहेर येउन बाईकवर बसला . तो आपली बाईक स्टार्ट करणार तेवढ्यात शेजारच्या मिसेस साहनी धावत धावत धापा टाकत आल्या . नुकत्याच स्नान झालेल्या ओलेत्या केसात साध्याच वस्त्रात त्या मोंटू समोर येऊन ओरडल्या , " मों . . . टू ! "
- " काय झालं ? " मोंटू दचकला .
-" फार मोठा अपशकून ! "
-"म्हणजे ? ओह ' ऑन्टी' , ' व्हाट इस धिस ' अपशकून ? "
-" तुला नाही समजणार . तू दोन मिनिटं आमच्या घरी ये . "
- मिसेस साहनी मोंटूला खूप आवडायच्या . दोन पोरांच्या आई असल्या तरी खूप सुंदर आणि मोहक दिसत होत्या . मोंटूला त्यांच भारी आकर्षण . पण पुढे व्हाढायचा काही ' चान्स ' च नव्हता , तरी मिसेस साहनींची सुंदर देखणी सोळा वर्षाची एक मुलगी होतीच कि ! ती ही त्याला खूप आवडायची . तशी मोनिका ही त्याला खूप आवडायची . ती त्याची कॉलेजातली ' बेस्ट फ्रेंड ' होती . पण आजकाल किती ही बेस्ट फ्रेंड असले तरी चालतात . कोणतीही मनाही नाही किंवा एका पेक्षा जास्त बेस्ट फ्रेंड नसावेत असला कोणता कायदाही नाही . शिवाय मोंटू ची मॉम , डेड व सिस्टर सुद्धा मिसेस साहनीच्या मुली विषयी मोंटूची घरात नेहमी थट्टा करायचे . आणि सारखी सारखी थट्टा होत असल्या मुळे , मोंटूला मिसेस
साहनींची मुलगी खरोखरच खूप आवडू लागली व तो अशा प्रकारे एकाच वेळी आई लेकींच्या प्रेम मध्ये गुरफटला गेला . मोंटू या आकर्षणामुळेच मिसेस साहनींकडे या न त्या कारणामुळे जाण्याची संधी शोधत असे .
- मिसेस साहनींचा नवरा सतत बाहेर फिरतीवर असायचा . मग मिसेस साहनी एकट्याच असायच्या . पदरी दोन पोरं . एक मुलगा आठ वर्षाचा व वयात आलेली एक मुलगी . अशा वेळेस त्यांना शेजारी राहणाऱ्या मोंटूची छोट्यामोठ्या कामासाठी गरज भासत असे . मोंटूही आनंदाने त्यांना मदत करायचा . मुलीला कोचिंग क्लास मध्ये सोडणे आणि घेऊन येणे , त्यांच्या बरोबर खेळणे , किंवा इतरही बाहेरची कामं तो आनंदाने करायचा . जास्तीत जास्त वेळ मिसेस साहनींच्या मुली बरोबर घालविता यावा याची तर तो वाटच पाहत असे .
मोंटू त्यांची कामं करीत असे म्हणून मिसेस साहानी देखील त्याच्याशी लाडीगोडीने वागायच्या . त्यांच्या वागण्यात दिलखुलास पणा असायचा .
- तर अशा प्रकारे मोंटूला मिसेस साहनींना टाळता येणे शक्य नव्हतं . आत गेल्यावर मिसेस साहनी जास्तच अस्वस्थ झाल्या . त्यांच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं . मोंटू नावाचा
आपला हिरो घाबरला . त्याच्या साठी ही ' सिचुएशन ' नवी होती . त्याला मिसेस साहनींच्या रडण्याचं कारणही माहित नव्हतं . मिसेस साहनींना कसं चुप करावं हे त्याला समजेना .
त्याची इच्छा झाली की मिसेस साहनींच्या गालावरचे अश्रू आपल्या हाताने अलगद टिपावे . तेवढीच मिसेस साहनींच्या गालावर हात फिरविण्याची मनोकामना पूर्ण होईल . पण त्यानं स्वत:ला आवरलं . मिसेस साहनींनीही लगेच स्वत:ला आवरलं . मोंटूच लक्ष नेमकं त्यांच्या खाली आलेल्या पदराकडे होतं , हे ही मिसेस साहनींच्या ध्यानात आलं . त्यांनी पदर नीट केला . मग हे पाहून मोंटूही भानावर आला आणि त्यानं विचारलं , " काय झाल ? "
- मिसेस साहनींनी परत एकदा डोळे पुसले . परत एकदा पदर अस्ताव्यस्त झाला . परत एकदा मोंटू चिलबिचल झाला .
-" त्याचं काय झालं , मी रोज सकाळी सहा वाजता स्नान करून मंदिरात देव दर्शनाला जाते . सकाळचं रोजचं फिरणंही होतं . तुला ठाऊकच आहे . " मिसेस साहनी म्हणाल्या .
-" बर मग . "
-" मग , मंदिरातून पूजेचं ताट घेऊन मी बाहेर पडले आणि पाहते काय , कावळा ! "
-" कावळ्याचं काय ? " मोंटूला काही उलगडा होत नव्हता . " ऑन्टी मला कॉलेजला जायला उशीर होतोय . माझ्या मॉमला बोलवू का ? "
-" नाही नाही , तुझ्याशीच काम होतं . "
-" मग सांगा ना . . . कॉलेजला उशीर होतोय . "
-" सांगते . काय झालं , सकाळी मंदिरातून मी बाहेर पडले तर सहज माझी नजर समोरच्या झाडावर गेली अन पाहते काय एका फांदीवर एक कावळा एका कावळ्याच्या चोचीत चोच
घालत होता ."
-" मोंटू पूर्णपणे गोंधळला , " ऑन्टी त्यात काय झालं ? "
-" नाही रे , असं कावळा कावळीला एक दुसऱ्याच्या तोंडात तोंड म्हणजे चोचेत चोच घालताना पाहणं फारच अपशकुनी असतं . आता नक्कीच घरात काही वाईट घडणार आहे . हे तिकडे फिरतीवर आहेत . कुठं त्यांच किंवा आमचं काही बरं वाईट झालं तर ? "
- मोंटू आता जम वैतागला , " कावळ्याचा आणि तुमचा काय संबध ? "
-" अरे ऐकून तर घे . कावळा कावळीला एक दुसऱ्याच्या चोचेत चोच घातलेलं बघितल्यावर मी घाबरले . लगेच मी मंदिरातल्या पुजाऱ्याकडे गेले . त्यांना सर्व प्रकार सांगितला . त्यांनी सांगितलं , हा फारच मोठा अपशकून आहे . काहीही मोठं वाईट घडू शकतं ."
-" अहो ऑन्टी , तुम्हाला कसं कळलं की त्यातला कावळा कोण आणि कावळी कोण ? मोंटू नी आपली शंका बोलून दाखविली .
-" अरे हे महत्वाचं नाही . महत्वाचं म्हणजे यावर उपाय . जर का काही वाईट थांबवायचं असेल तर जसा शापासाठी उ:शाप असतो तसं या अपशकुनाचे काही वाईट परिणाम घडू नये
यासाठी त्या पुजाऱ्यांनी मला एक उपाय सांगितला आहे . "
-" कोणता उपाय ? "
-" कावळा हा सर्वात नीच प्राणी ! " मिसेस साहनी सांगू लागल्या , " पक्ष्यांच्या कोमलतेला काळिमा फासणारा . पिंडाला सुद्धा सहसा शिवत नाही . सदैव प्रत्येकाचं अहित करणारा . म्हणून
या अपशकुनाचा प्रभाव कमी करण्यासाठी ज्या व्यक्तीने ही घटना बघितली आहे त्याच्या मृत्यूची खोटी बातमी त्याच्या जवळच्यांना कळवायला हवी . म्हणजे अपशकुनाचा प्रभाव कमी होतो व नंतर सर्वाना वस्तुस्थिती सांगता येते येते . "
-" मग तुम्ही कळवा ना . मी काय करू शकतो ? " मोंटूला आता चिडायला झालं होतं .
-" अरे तूच तर करू शकतोस . हे बघ याच शहरात माझी छोटी बहिण राहते . तुला तिचं घर माहीतच आहे . तिच्या कडे तू जा आणि माझ्या मृत्यूची बातमी तिला दे "
-" काय मी ? " मोंटू घाबरला .
- " होय तूच ! " आता मिसेस साहनींनी मोंटूचा हात आपल्या हातात घेतला . त्याच्या केसांना कुरवाळीत त्या म्हणाल्या , " तू नाही सांगणार तर कोण सांगणार ? आपल्या ऑन्टी साठी इतकंसं काम नाही का करणार तू ? " मिसेस साहनींनी मोंटूचा हात अद्यापही सोडला नव्हता . मोंटूला तर शहाराच आला अंगावर . बरं , मिसेस साह्नींची मुलगीही त्याच्याकडे प्रेमाने पाहात होती . यामुळे मोंटू मंत्रमुग्धही झाला होता , आणि या दुहेरी हल्ल्यामुळे नाही म्हणायची सोय नव्हतीच . शेजार धर्म हे होताच . रोजच उठणं बसणं होतं . मोंटू ने विचार केला , नुसतं कळवायचंच तर आहे . असा हा मोंटू नावाचा हिरो एकांगी प्रेमाच्या दुहेरी मोहात अडकून त्यावर शेजार धर्माचे आवरण घालून आपले कर्तव्य पाडायला तयार झाला .
- " बरं नीट सांगा मला , काय बातमी देऊ त्यांना ? "
-" त्यांना सांग , आज सकाळी पाच वाजता बाथरूममध्ये पाय घसरल्याने मी पडले . उठण्याचा प्रयत्न करत असताना नळाला जोराने डोकं आपटलं व माझा मृत्यू झाला . "
-" डायरेक्ट मृत्यू ? "
-" त्याच्याशी तुला काय करायचं ? "
-" नाही त्यांनी विचारलंच तर ? "
-" तू तिथं थांबूच नको . बातमी देऊन सरळ निघून ये . नंतर सर्व सरळ इकडेच येतील तेव्हा त्यांना वस्तुस्थिती कळेलच . "
- मिसेस साहनी आणि त्यांच्या सोळा वर्षाच्या मुलीच्या आकर्षणात गुंतलेला असा हा मोंटू नावाचा ' बर्थडेबॉय ' मंत्रमुग्ध होऊन एक नवीन ' एडवेंचर ' करायला आपल्या बाईक वर स्वार होऊन निघाला. सकाळच्या वेळेस रस्ते मोकळेच होते , पण मोंटू ' एडवेंचर ' करायला निघाला होता म्हणून सारखा सारखा ' हॉर्न ' वाजवत होता .
- एका जुनाटशा घराजवळ मोंटू थांबला . तेथे चार मजले वर चढून त्याला मिसेस साहनींच्या बहिणीला बातमी द्यायची होती . मोंटू या अगोदरही येथे मिसेस साहनींच्या मुलीला सोडायला व तिला परत घ्यायला येउन गेला होता . एका हातात हेल्मेट , तर दुसऱ्या हातात ' गॉगल्स ' व पाठीवर कॉलेजची बेग लटकवत मोंटू एक एक पायरी चढत होता . काहीपायऱ्या चढल्यावर त्याला मिसेस साह्नींवर हसू आलं . नंतर त्याच्या हसण्याचा वेग वाढला . कुठे मिसेस साहनी , कुठे त्यांची बहिण , आणि कुठे मोंटू ? या सर्वांचा कावळ्याशी
काय संबध ? हसऱ्या चेहऱ्याने तो मिसेस साहनींच्या बहिणाला ही बातमी कशी काय देणार ? काय करावे हे त्याला कळेना . हसऱ्या चेहऱ्याला त्याला सुतकी चेहऱ्यात बदलायचं होतं .
पण तसं त्याला त्या क्षणी जमत नव्हतं . त्याने स्वत:ला आवरण्याचा प्रयत्न केला . मिसेस साहनींच्या बहीणीच्या फ्लेटच्या दाराबाहेर तो काही वेळ थांबलाही . पण हसू येणं थांबत नव्हतं . आता वेगवेगळ्या कल्पनेनं त्याला हसू येत होतं . कॉलेजला उशीर होत होता . शेवटी त्याने स्वत:लाच जोराने चिमटा घेतला , मिसेस साहनी व त्यांच्या सुंदर मुलीचा चेहरा समोर ठेवला व डोळे बंद करून सरळ आपलं एक बोट बेलच्या बटणावर वर ठेवलं .
- बेलचा आवाज होताच तो घाबरला . आता त्याला पुढच्या परिस्थितीला तोंड द्यायचं होतं . कुठून हे संकट ओढवून घेतलं असं त्याला वाटू लागलं . मिसेस साहनींच्या बहिणीच्या नवऱ्यानं दार उघडलं . मिसेस साहनींची बहिण मागे उभी होती , तोंडात ब्रश होता .
- " यस " मोंटू ला पाहताच मिसेस साहनींच्या बहिणीच्या नवऱ्याच्या तोंडातून निघालं .
-" अरे मोंटू ! तू सकाळी सकाळी ? " मिसेस साहनींच्या बहिणीच्या तोंडातून ही निघालं .
- एव्हाना मिसेस साहनींची म्हातारी आई पण मागे येउन उभी राहिली .
- सकाळी मिसेस साहनींनी ज्या ' सिचुएशन ' ची कल्पना मोंटूलां दिली होती त्या पेक्षा इथं फार वेगळीच ' सिचुएशन ' होती . फक्त मिसेस साहिनींच्या बहिणीशी त्याचा सामना होईल
असा त्याचा अंदाज होता . नंतर संबध रस्त्यात कंठस्थ केलेले काही शब्द बोलून तो लगेच येथून पळ काढणार होता . नव्या परिस्थितीत मोंटू गोंधळला , घाबरला , व काय सांगायचं आहे नेमकं हेच विसरला . नंतर त्याला म्हातारीचीही भीती वाटू लागलं . बातमी ऐकून हिचं काही बरं वाईट झालं तर वेगळंच नवं संकट निर्माण होऊन बसेल . शेवटी थोडी हिम्मत करून आणि काही ठरवून तो मिसेस साहनींच्या बहिणीच्या नवऱ्याला म्हणाला , " जी एक वाईट बातमी आहे ."
-" काय ?"
-आता बातमी सांगायची व सरळ येथून पळ काढायचा हा विचार करून तो म्हणाला , " वाईट बातमी आहे , आपण यांना तूर्त घरी पाठवा . "
- " अरे पण झालं काय ? " नवऱ्यानं विचारलं .
-" काल रात्री मिसेस साहनींचा अपघात झाला आहे .
-" काय ? " सर्व घाबरले सर्वांच्या तोंडातून एकाचवेळी निघालं , " कसा . . . ? केव्हा . . . ? कुठे . . ? "
-" काल का नाही कळवलं ? " नवऱ्यानं विचारलं .
- म्हाचा महिना तारी तर खालीच बसली .
- " अरे देवा ss " बहिणने मोंटू कडे पाहिलं व आईला सांभाळलं .
-" काल रात्री स्कूटरवरून घरी परतताने रस्त्यावर त्यांना एका कार ने त्यांना धडक दिली . मी घाईत आहे , निघतो . " इतकं सांगून एकही क्षण न थांबता मोंटू ने तिथून पळ काढला .
व सरळ कॉलेजमध्ये पोहचला .
***
- संध्याकाळी ठराविक वेळेला मोंटू आपल्या घरी पोहचला . घडलेला सर्व प्रकार त्यानं आपल्या 'मॉमला ' सांगितला . त्यानं 'मॉमला ' हे ही सांगितलं की मिसेस साहनींच्या बहिणीला मिसेस साह्नींच्या मृत्यूची खोटी बातमी देण्याचे त्याने टाळले . ' मॉम ' खूप संतापली व मिसेस साह्नींना वेळ आल्यावर याचं उत्तर दिलं त्याना
जाईल असा तिनं निर्धार ही केला .
' बर्थडे ' पार्टीसाठी लगेच निघायचं होतं म्हणून ती मोंटूलाही काहीच म्हणाली नाही .
-उन्हाळ्याचे दिवस जूनचा महिना , संध्याकाळी सहाच्या सुमारास मोंटूच्या घरचे सर्व हॉटेलात पोहचले . पाठोपाठ मिसेस साहनी व त्यांची पोरंही हॉटेलात आली . मोंटू ही ' बर्थडे बॉय ';
बनून नटून-सजून सर्वांच्या स्वागतासाठी सज्ज झाला होता . रात्री आठ वाजता केक कापला जाणार होता . तो पर्यंत म्युझिक मस्तीसाठी सर्व व्यवस्था होतीच .
- मिसेस साहनी मात्र मान वर करून लॉन मध्ये फिरत होत्या .त्यांना ही कल्पना होतीच की मोंटूने आपल्या मॉमला नक्कीच सर्व सांगितलं असेल . पण त्यांना हा अंदाज नव्हता की मोंटूने त्यांच्या मृत्यूची खोटी बातमी त्यांच्या बहिणीला दिली नव्हती . मोंटूचा वापर आपण कितपत आणि कसा करू शकतो हेही मिसेस साहनींना मोंटूच्या मॉम ला आज दाखवून द्यायचं होतं . त्यासाठी त्या सज्ज होत्या व किटी पार्टीतल्या मैत्रिणींच्या येण्याची वाट पाहत होत्या .
- सूर्यास्त अजून झालेला नव्हता . सर्व गप्पांमध्ये रंगले होते .' बर्थडे पार्टी ' अजून सुरु व्हायची होती . ' कोल्डड्रिंक ' ' सर्व ' होत होते . तेव्हढ्यात अचानक जोरजोराने कांवकांवचा कर्कश आवाज ऐकू आला .
- सर्वात अगोदर मोंटूच्या मॉमने कावळ्यांचा थवा बघितला . मग मोंटूचे लक्ष गेले . मग मिसेस साहनींचे लक्ष कावळ्यांच्या थव्याकडे गेले . रस्त्याच्या पलीकडे एका झाडावर अनेक कावळे कर्कश आवाजात कांवकांव करत गोळा झाले होते . त्यातले अनेक एक दुसऱ्याच्या चोचेत चोच घालून होते . हे द्रश्य बघून सर्वाना आश्चर्य झाले .
-मिसेस साहनीचा चेहरा मात्र पांढरा पडला . परत एकदा अपशकून !
- मोंटूच्या मोमने मिसेस साहनींकडे बघितलं . त्यांचा चेहरा पाहून मॉमला आनंद झाला . " मोठी आली माझी जिरवणारी ! " असं ती मनातल्या मनात म्हणाली . मोंटू मिसेस साहनी व त्यांच्या मुलीजवळ उभा होता . मॉम मोंटू जवळ आली व म्हणाली , " दोन पक्षी जेव्हा एक दुसऱ्यावर प्रेम व्यक्त करतात तेव्हा ते कोणाच्या मृत्यूची कामना करत नाहीत . अशा वेळेस त्यांच्या पासून काही शिकायचंच असतं . त्यांना घाबरण्याचं काहीच कारण नाही .
पक्ष्यांचं प्रेम करणं कोणताही अपशकून नसतो . त्यांच्या प्रेम करण्याने कोणाचेही वाईट होत नाही . "
- मोंटू च्या मॉमने मिसेस साहनींकडे गर्वाने बघितलं . आजच्या दिवसाचा मिसेस साहनींची जिरवायचा मान मोंटूच्या मॉमला मिळाला होता . पण दुसरा . पहिला मान कावळ्यांनीच मिळविला होता . //// समाप्त //// //////
******************************************

 

 


विश्वनाथ शिरढोणकर

Powered by Froala Editor

LEAVE A REPLY
हर उत्सव के अवसर पर उपयुक्त रचनाएँ