Swargvibha
Dr. Srimati Tara Singh
Administrator

यातना सोसायला बळ द्याल राजे!

 

**********************************************
यातना सोसायला बळ द्याल राजे!
पण, पशूवत चालले हे हाल, राजे!!

 

निवडुनी आम्ही दिले या शासकांना......
शासकांनी त्याच केले हाल, राजे!

 

आमची दु:खे कधी जाणाल राजे?
काय अमुचे चाललेले हाल, राजे!

 

हे दिवसही आमचे जातील राजे.......
एवढे छोटे न अमुचे भाल, राजे!

 

कैक बळिराजे बळी जातात नाहक......
ही कुठे पापे तुम्ही फेडाल राजे?

 

जाहलो पुरते कफ्फलक सर्व आम्ही!
प्राण आता आमचा का घ्याल राजे?

 

एकही नाही जिता वस्तीत कोणी.......
सांगण्यासाठी तुम्हाला हाल राजे!

 

जीभ तलवारीपरी तुमची परंतू.......
का बरे नाहीच कुठली ढाल राजे?

 

अंध ना आम्ही, किती दडपाल चोरी?
ओळखू आलाच मुद्देमाल, राजे!

 

चित्रगुप्ताच्या जवळ असतात नोंदी.......
या अशा नोंदी किती खोडाल राजे?

 

सोसण्याची हद्द झाली आमुच्या हो......
एवढे ताणाल, तर तोडाल राजे!

 

एकही शाबूत नाही ठेवले का?
आमची स्वप्ने किती फोडाल राजे?

 

उघडण्या नशिबास येते साल राजे.......
हे पहा जवळून अमुचे भाल राजे!

 

 

 

-------प्रा. सतीश देवपूरकर

Powered by Froala Editor

LEAVE A REPLY
हर उत्सव के अवसर पर उपयुक्त रचनाएँ