शोक तू करतोस की, या पावसाने घर बुडाले!
माझिया तर जिंदगानीचे अरे, छप्पर बुडाले!!
मान्य की, गलबत बुडाले, पण अरे, कोठे बुडाले?
ते समुद्री खोल, तरले मात्र काठावर बुडाले!
काय सांगू, पर्वताच्या चक्क खांडोळ्याच झाल्या.....
ढगफुटीने कालच्या त्या येथले सागर बुडाले!
वाचलो मी, बायको अन् पोरगा प्रलयातुनी त्या....
पोर टाहो फोडुनी म्हणते मला, दप्तर बुडाले!
पाहिला नव्हता उभ्या जन्मात धरणीने प्रलय हा....
ज्यामधे बुडले चराचर आणि जन्मांतर बुडाले!
कैक लोकांना किनारी घेउनी आल्यात लाटा....
पण, किना-यावर बिचारे पोचल्यानंतर बुडाले!
वाहुनी रस्ताच गेला, बांधता येईलही.....
कोठुनी येणार मैलांचेच जे पत्थर बुडाले!
-------प्रा.सतीश देवपूरकर
Powered by Froala Editor

LEAVE A REPLY