Swargvibha
Dr. Srimati Tara Singh
Administrator

माणसे दिसतात सारी, जाहिरातींसारखी!

 

 

माणसे दिसतात सारी, जाहिरातींसारखी!
वाटती नाती जणू विक्री-खरेदींसारखी!!

 

माझिया हातून झाले ब्रह्मघोटाळे जणू......
पेशगी कोर्टात झाली घोडचूकींसारखी!

 

आठवाया लागलो संभाषणे नजरेतली......
वागली स्मरणे तुझी अगदी अडाणींसारखी!

 

मौन गाणारे, तुझ्या मुद्रा सुरील्या वाटती.....
देहगाणी जाहलेल्या देहबोलींसारखी!


(देहगाणी म्हणजे वरवर शरीरविषयक पण अर्थाने मात्र गूढ आत्म्याविषयी व ब्रह्माविषयी असलेली गाणी)

या अदा कातिल तुझ्या, पेलायच्या दुनियेस ना.....
ही लकब प्रत्येक वाटे चक्क अकडींसारखी!


(अकडी म्हणजे नखरा/डौल/ऐट/दिमाख/वाकडेपणा/बाकपन)

प्यायला एकेक मिसरा आग हृदयातील अन्.....
लागली वाटू गझल दुनियेस ठिणगींसारखी!

 

लागला वणवाच माझ्या काळजामध्ये असा......
शायरी माझी भडाडे रानआगींसारखी!

 

ना मला आली गुलाबी शायरी करता कधी......
जिंदगी कष्टात गेली ऊरफोडींसारखी!

 

ही अशी शिक्षा दिली मज जिंदगीने शेवटी.......
रोज धावाधाव नशिबी.....ऊठबैशींसारखी!

 

घर खुराड्यासारखे....कोंदट हवा घोंगावते......
पण कडाक्यालाच वाटे तीच ऊबींसारखी!

 

पेटती ज्वाळा भुकेच्या आगडोंबासारख्या........
जाळते मजला गरीबी रोज आगींसारखी!

 

कुंड गझलेचे अहोरात्रीच तेवत ठेवतो......
जाहली माझी अवस्था अग्निहोत्रींसारखी!

 

वेष वरदानाप्रमाणे वाटतो शापा, तुझा......
लाभली मजला अघाडीही पिछाडींसारखी!

 

दर्शनी करती उपेक्षा....चोरुनी का वाचती?
वाटते माझी गझल का मोजपट्टींसारखी?

 

मी बरा, माझ्यासवे, ही शायरी, माझी बरी!
ही प्रसिद्धीची खरेदी देहविक्रींसारखी!!

 

राजकारण जाहलेले एक आखाडा जणू......
रोज कुस्त्यांचीच चलती अंगमस्तींसारखी!

 

लाघवी बांधा, दिसाया चेहराही गोजिरा.......
गझल वाटे कामिनींच्या अंगयष्टींसारखी!

 

कैक गझला पाहतो मी नेटवर ऐशाच की,
शब्दपाल्हाळीक नुसती.....अंगवृद्धींसारखी!


(अंगवृद्धी म्हणजे लठ्ठपणा इथे शब्दपाल्हाळीकतेचा/शब्दबंबाळतेचा लठ्ठपणा)

तू दिलेले घाव झरले माझिया गझलेमधे.......
वाटते माझी गझल बघ, अंगलेणींसारखी!


(अंगलेणी म्हणजे दागिने/अलंकार)

रोज मी एकेक करतो पार टप्पा बारका.....
जिंदगी मज लाभलेली अडवणूकींसारखी!

 

चौकडे सौजन्य दिसते....फायद्याच्या घोषणा......
भोवती सुटली हवा बघ, निवडणूकींसारखी!

 

कैक नेत्यांच्या सभांना पाहिले जाऊन मी.......
पाहिली जादूगरी ऐशी न मोदींसारखी!

 

छान तू केलास हा पोषाख साजेसा तुला......
भाषणेही ठोक आता थोर व्यक्तींसारखी!

 

जाळला मी जन्म हठयोगात गझलेच्या अरे.......
शायरी पाणीच भरते.....रिद्धिसिद्धींसारखी!

 

पार खांडोळीच केली प्रथम चाकानेच रे........
माणसे कित्येक गेली आगगाडींसारखी!

 

दंगली अन् जाळपोळी सरफि-या नेत्यांमुळे......
वाटती वचनेच ज्यांची आगकाडींसारखी!

 

नजर आहे की, दुधारी शस्त्र आहे हे तिचे?
काळजामध्ये घुसडते ती कट्यारींसारखी!

 

आजही शिकवण भटांची सोबतीला माझिया.....
आजही उपयुक्त पडते ती शिदोरींसारखी!

 

त्यामुळे त्यांची गझल ना आवडे मजला तरी.....
प्रत्ययांविण चमकते ती फक्त कल्हईंसारखी!

 

शब्दचातुर्यामुळे का वश गझल होते कधी?
एक गझलीयत हवी भट, कतिल, कैफींसारखी!

 

 


-------प्रा.सतीश देवपूरकर

 

Powered by Froala Editor

LEAVE A REPLY
हर उत्सव के अवसर पर उपयुक्त रचनाएँ