जसे प्रेत माझे जळू लागले!
पहा लोक कैसे पळू लागले!!
घरोबा प्रसिद्धीसवे जाहला....
तसे कैक शायर टळू लागले!
धुणे सोडुनी मी दिले शेवटी....
अता रोज कपडे मळू लागले!
असे काय गझलेमधे माझिया?
अता मान्यवरही चळू लागले!
किती ओढ मदिरे, तुझी लागली....
पहा पाय माझे वळू लागले!
कशाला वचन देउनी बैसलो?
मला स्वप्न माझे छळू लागले!
तुझ्या संगतीचाच परिणाम हा.....
मला हित स्वत:चे कळू लागले!
असा गोड मी लागलो त्यांस की,
मला लोक आता दळू लागले!
-------प्रा.सतीश देवपूरकर
Powered by Froala Editor

LEAVE A REPLY