चुलीला लाकडे आली, भुकेला भाकरी केली!
जगाला वाटले की, मी दिवाळी साजरी केली!!
दिले तू श्वास मजला अन् दिले हे ओठ गाणारे....
जणू तू जिंदगानीचीच माझ्या बासरी केली!
नको ते लोक आले अन् घरी डोकावुनी गेले....
जिता अद्याप की, मेलो जगाने खातरी केली!
मुले म्हणतात साठीची करू शांती अता जंगी...
म्हणालो मी नको म्हणुनी अम्ही घरच्या घरी केली!
असे का वाटते मजला कुणी मज फसविते आहे....
जणू काही कुणी करणी असे माझ्यावरी केली!
अरे, हे पोट आले आड माझ्या स्वाभिमानाच्या....
सतत खालील मानेने निमुट मी नोकरी केली!
कितीही चांगली केली गझल पण, आमचे गुरुजी....
खुणेने मज म्हणायाचे....बरी केली! बरी केली!
-------प्रा.सतीश देवपूरकर
Powered by Froala Editor

LEAVE A REPLY