Swargvibha
Dr. Srimati Tara Singh
Administrator

यत्न करतो आजही

 

मी तुला विसरावयाचा यत्न करतो आजही
शक्य नाही ते कराया युध्द लढतो आजही

 

तू जशी गेलीस सखये, ग्रिष्म आहे सोबती
मी ऋतू गंधाळण्याची वाट बघतो आजही

 

सागराला का असावी ओढ चंद्राची अशी?
पौर्णिमेला भेट घडणे योग नसतो आजही

 

दार केले बंद माझ्या मी मनाचे पण तरी
आठवांचा झोत तुझिया आत घुसतो आजही

 

कृष्ण नाही, फक्त दिसतो कौरवांचा राबता
काय व्हावे द्रौपदींचे? प्रश्न उरतो आजही

 

अंधश्रध्दा एवढी की संकटे येता क्षणी
सामना करतो न आम्ही, देव पुजतो आजही

 

कलियुगातिल मयसभेची आखणी केली कुणी?
दुष्ट हसतो, सत्त्यवादी आत पडतो आजही

 

का दिल्या गरिबांस फसव्या योजना, अश्वासने ?
मोकळ्या पोटी भुकेचा डोंब जळतो आजही

 

सोसल्या "निशिकांत" का तू भाववाढीच्या झळा?
भाव नसतो माणसाला, स्वस्त विकतो आजही

 

 

निशिकांत देशपांडे.

 

Powered by Froala Editor

LEAVE A REPLY
हर उत्सव के अवसर पर उपयुक्त रचनाएँ